दि. 22 जुलै 2021 रोजी महाड, पोलादपूर, चिपळूण येथे अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरात अनेक निष्पाप नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले. शिवाय असंख्य कुटूंबे उध्वस्त होऊन संसार रस्त्यावर आले. टीव्हीवरील बातम्यांमुळे तेथील परिस्थिती लक्षात घेता समाजबांधवांना आपल्या मदतीची गरज आहे हे ओळखून त्यांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी विश्वकर्मा सुवर्णकार समाज मुंबई संस्थेने तातडीची सभा घेऊन पूरग्रस्त भागांना भेट देण्याचा व त्यांना गृहोपयोगी वस्तू मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले. मदतीसाठी आवाहन करण्यात आले. समाजबांधवांनी, कार्यकर्त्यांनी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. शिवाय संस्थेनेही लागेल ती मदत देण्याचा निर्धार केला. त्यामुळे या उपक्रमाला बळ मिळाले आणि कोकणातील पुरग्रस्त बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी दि.16/17 ऑगस्ट 21 रोजी मुंबईहून संस्थेचे कार्यकर्ते निघाले. हे पथक महाड येथे दुपारी 12.30 वा. पोहोचल्यानंतर जेष्ठ समाजकार्यकर्ते व अनेक संस्थांचे हितचिंतक कै.सुभाषशेठ वा. शागवेकर यांच्या निवासस्थानी गेलो. तेथे दक्षिण रायगड वि.सु.स.चे अध्यक्ष श्री.दिगंबर नगरकर आणि त्यांच्या कार्यकर्ते सहकार्यांनी आमचे स्वागत केले. सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर कै.सुभाष सागवेकर यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले. त्यावेळी तेथे अनेक पुरग्रस्त समाजबांधव उपस्थित होते. त्या सर्वांना मदतीचे किट देऊन पुढे दासगांवमधील समाजबांधवांना मदत देण्यात आली. महाडमधील दिवंगत जेष्ठ कार्यकर्ते कै.कांतीलाल धों. देवरूखकर यांचे बंधू व युवामंचच्या उपाध्यक्षा सौ.भाग्यश्री सुमित देवरूखकर यांचे सासूसासरे कै.दिलीप धोंडू देवरूखकर व कै. सुनिता दिलीप देवरूखकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा मुलगा श्री.सुमित व त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करून त्यांना मदत देण्यात आली. पुढे शिरगांव येथेपूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. तेथील समाजबांधव श्री.सुरेश ना. शागवेकर यांच्या आईचे निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने अतिवृष्टीमुळे आईचे काय हाल झाले होते हे कथन केल्यावर आम्हां सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत. त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना वस्तूरूपी मदतीबरोबरच संस्थेतर्फे आर्थिक मदतही देण्यात आली. तत्पूर्वी महाड संस्थेचे चिटणीस श्री.प्रदिप चिखलकर यांचे पूर्ण घर पाण्यात डुबले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी बोटीतून जाऊन घराच्या आड्यावरून परिवाराला बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या घरी जाऊन घराची पाहणी केली. त्यावेळी तेथील परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले. तेथून पुढे चोचिंदे येथे सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांच्या मंदिराची पाहणी केली. मंदिरात पूर्ण पाणी भरले होते. संस्थेची कागदपत्रे व इतर ऐवज पूर्णपणे भिजले होते. मंदिराची पूजा, देखरेख करणारे श्री. चिखलकर यांना व तेथील बांधवांना मदत देऊन आम्ही अध्यक्ष श्री. दिगंबर नगरकर व कार्यकर्तेसह बिरवाडीच्या दिशेने निघालो. ही परिस्थिती पाहून दुपारच्या जेवणाचेही भान राहिले नाही. बिरवाडी येथील समाजबांधवांची विचारपूस केली असता अनेक कुटूंबांना पुराची झळ बसली होती. जवळजवळ 35 कुटूंबे तेथे राहत असून तेथील 19 कुटूंबांना मदत देण्यात आली. यावेळी तेथील बांधवांनी आम्हाला मार्गदर्शन करा असा आग्रह धरला असता अध्यक्ष श्री.विलास वाडेकर व माजी अध्यक्ष श्री. सदानंद नगरकर यांनी आम्ही आपली भेट घेऊन चौकशी करण्यास आलो आहोत. आपले भरपूर नुकसान झाल्याचे समजले. याबद्दल वाईट वाटले. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने आपले समाजबांधव राहत असताना समाजाच्या कार्यक्रमांसाठी कधी उपस्थिती दिसत नव्हती. थेव्हा यापुढे महाड, पोलादपूर किंवा कुठेही समाजाचे कार्यक्रम असतील तेथे आपली उपस्थिती असली पाहिजे. समाजाची प्रगती करण्यासाठी आपण सर्वांनी सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आजच्यासाठी एवढे पुरेसे आहे. आता आम्ही आणलेली मदत स्विकारून आम्हास सहकार्य करावे. यानंतर उपस्थित बांधवांना मदत देऊन महाडच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन निरोप घेतला व पोलादपूरला सायं.6.30वा. दरम्यान पोचलो. माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रमेश रा. पालकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची व पोलादपूरच्या बांधवांची आस्थेने चौकशी केली. पुराबद्दल विचारले असता तेथे फक्त एकाच कुटूंबाचे घरात पाणी जाऊन नुकसान झाल्याचे कळले. त्या कुटूंबप्रमुखाला बोलाऊन त्यांची चौकशी करून त्यांना मदत देण्यात आली. यावेळी सर्वश्री रमेश पालकर, विजय पालकर, राजन पालकर, मंगेश नगरकर, रविंद्र नगरकर इ. उपस्थित होते. तेथे चहापाणी घेऊन जेष्ठ समाजबांधव श्री. प्रभाकर पालकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईच्या निधनाबद्दल त्यांचे सांत्वन करून श्री.मंगेश नगरकर यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा श्री.अमरदिप यास करोना काळातील उत्तम कामगिरीबद्दल पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार व गौरव झाल्याबद्दल त्याचे संस्थेच्या वतीने कौतुक करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बोरीवली मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते श्री.भालचंद्र स. देवरूखकर आम्हाला येऊन भेटले. खेडचे अध्यक्ष श्री.भास्कर पालकर व सेक्रेटरी श्री. रमेश सागवेकर यांना संपर्क केल्यावर ते त्वरीत तेथे पोहोचले. त्यांच्याजवळ पूरग्रस्तांविषयी चौकशी केली असता कै.रविंद्र देवरूखकर यांच्या दुकानात पाणी शिरले आणि दयाळ गावच्या देवरूखकरांच्या घरी पाणी भरल्याचे सांगितले. रात्री 9.15 वा. त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. दिवसभर प्रवास आणि पूरग्रस्त ज्ञातीबांधवांची परिस्थिती पाहून सर्वांची मने व्यथित झाली होती. त्यातही श्री.भालचंद्र देवरूखकर व श्री. शांतारामभाऊ सागवेकर यांनी जेवण्याची व्यवस्था केली होती. सकाळी लवकर उठून कै. रविंद्र बबन देवरूखकर यांच्या परिवाराला भेटून पुढे चिपळूणला जाण्याचे ठरविले. सकाळी खेडहून निघताना प्रथम भरण्याच्या सुप्रसिद्ध जागृत कालकाई मातेचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. तेथे खेडचे अध्यक्ष श्री.भास्कर म.पालकर, चिटणीस श्री. रमेश सागवेकर व वैजेश सागवेकर यांनी आमची गाडीतच नाष्टा व चहाची सोय केली होती. त्यांना सोबत घेऊन स्व.रविंद्र बबन देवरूखकर यांच्या घरी गेलो. तेथे त्यांचे आईवडिल, भाऊ, मुलगा व पत्नी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी त्यांच्या आईच्या भावना अनावर झाल्या होत्या. तेथून खेडवासियांना सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन चिपळूणला निघालो. चिपळूणला पोचल्यानंतर तेथील संस्थेचे पदाधिकारी श्री निलेश रा. शागवेकर यांनी आमचे स्वागत केले व प्रथम चिपळूण संस्थेचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.सुभाषशेठ रा.देवरूखकर यांच्या घरी गेलो. नुकतेच त्यांच्या आईचे आणि तरूण मुलाचे निधन झाले होते शिवाय त्यांच्या घरी व दुकानात पाणी भरले होते. शेतीचे पण खूप नुकसान झाले. अशी एकापाठोपाठ एक संकट त्यांच्या परिवारावर आली होती. त्यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. आई व मुलाविषयी माहिती घेतली. या संकटातून सावरण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. नंतर त्यांच्या सोबत चिपळूणच्या पूरग्रस्तांविषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी श्री.निलेश सागवेकरांना घेऊन कशा प्रकारे मदतीचे वाटप करता येईल ते सांगितले. त्यांचा निरोप घेऊन आम्ही चिपळूणचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री पांडुरंग (हरूशेठ) शं. पालकर यांच्या घरी गेलो. त्यांच्या सुविद्य पत्नीचेही नुकतेच निधन झाले होते. दुकान, दवाखाना पूर्णपणे पाण्यात गेले. गणेशमूर्तिंचीही हानी झाली होती. त्यांना भेटलो असता त्यांनी पत्नीच्या आठवणी सांगता सांगता दुःख अनावर झाले. आम्ही सर्वांनी त्यांचे सांत्वन करून पुढे श्री. विलास सागवेकर यांच्या दुकानात गेलो. त्यांची भेट घेऊन समाजबांधवांची मदत त्यांच्या दुकानात ठेवली. या अवधीत श्री. प्रदिप देवरूखकर यांची सदानंद नगरकर यांनी भेट घेऊन त्यांचेही सांत्वन केले व त्यांची विचारपूस केली. नंतर रत्नागिरी जिल्हा माजी अध्यक्ष, जेष्ठ समाज कार्यकर्ते कै. बाप्पाशेठ पालकर यांचे मुलगे श्री. महेंद्र व मिलींद यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांना मदतीचे किट देऊन त्यांच्याकडे अजून चार घरांचे मदत किट ठेवण्यात आले. श्री चंद्रकांत सागवेकर यांचे घर पाण्याने भरले होते. त्यांच्या दुकानातील सामानाचे खूप नुकसान झाले होते. यानंतर दत्तात्रय पंडित व दिलीप देवरूखकर यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस करून त्यांनी मदतीचा हात दिला. वेतोसकर तसेच गणपतीचे कारखानदार श्री. विजय सागवेकर (पेंटर) यांची भेट घेतली असता मातीचे गणपती असल्यामुळे सर्व मूर्ती विरघळून गेल्या. सर्व नवीन मूर्ती मागवाव्या लागल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही बऱयाच बांधवांची भेट घ्यायची ईच्छा होती पण तेथील वातावरण ठीक नव्हते, सर्वत्र दुर्गंधी पसरली पसरलेली शिवाय आम्ही गेल्यानंतर त्यांच्या कामाचा खोळंबा होत होता. सर्वत्र साफसफाईचे काम सुरू होते. भिजलेल्या वस्तू सुकवण्याचे प्रयत्न चालले होते. त्यामुळे राहिलेली मदत श्री. निलेश सागवेकर यांच्याकडे वाटपास देण्यात आली. दुपारी 3.30 ते 4 दरम्यान भोजन केल्यानंतर श्री. निलेश सागवेकर यांना आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन आम्ही लोटे येथे सायं.5वा. पोहचलो. उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व लोटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मोहनसर वारणकर यांची त्यांच्या घरी भेट घेतली. नुकतेच त्यांच्या तरूण मुलग्याचे निधन झाले होते. त्याबद्दल त्यांचे बंधू श्री.अरूण वारणकर यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी मोहनसरांना शोक अनावर होऊन अस्वस्थ झाले होते. त्यांचे सांत्वन करून लोट्यातील परिस्थितीची माहिती घेऊन जेष्ठ कार्यकर्ते श्री.सदाशिव वारणकर गुरूजींची भेट घेतली. त्यांना आता वयोमानामुळे धावपळ झेपत नसल्यामुळे घरूनच समाजाबद्दल माहिती घेत असतात. श्री.सदानंद नगरकरांकडे मुंबईच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची चौकशी करीत होते. पुढे सदानंद नगरकर यांचे भाऊ कै.महादेव नगरकर यांचा मुलगा महेश याची भेट घेऊन त्यांचे व कुटूंबियांचे सांत्वन केले. तेथून पुढे मुंबईचा परतीचा प्रवास सुरू झाला. सोबतच्या सर्वांना त्यांच्या ठिकाणापर्यंत सोडत सरचिटणीस मोहन नगरकर आणि खजिनदार संतोष देवरूखकर हे दादर येथे रात्री 2.30 वा उतरून आपापल्या घरी गेले. सर्वांनी वेळेत सहकार्य केल्याबद्दल कार्यकारिणीचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.